वेळ होती सकाळी दहाची. भिडे वाड्यात मुली डोळ्याचा चातक करून सावित्रीबाईंची वाट पाहत होत्या. कधी एकदा आमची माऊली येते आणि आम्हाला पदराखाली घेते, याचा विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात दारात सावित्रीबाई आपले कपाळ रक्ताने माखलेल्या पदराने दाबून धरत आत येताना दिसल्या. ज्या पदरा खाली बसायचं होतं तोच पदर रक्ताने माखलेला होता. सगळ्या मुली रक्त पाहून हंबरडा फोडून सावित्रीबाईंच्या भोवती गोळा झाल्या. कशाबशा त्यांना बाजूला बसवून शांत करून सावित्रीबाईंनी स्वतःच डोक्याला पट्टी बांधली शेणामातीने माखलेली साडी बदलली. मुलींना कोळशाच्या पेन्सिलीने आणि जमिनीच्या पाठीवर अक्षर गिरवण्याचा सराव देऊ लागल्या. या छोट्याशा गोष्टीतून मित्रांनो माझ्या मनोगताचा विषय तुमच्या लक्षात आला असेल.
व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो.... अज्ञानरूपी अंधकाराने व्यापलेल्या, कळकट समाजातील स्त्रियांच्या, हृदयात.... शिक्षणाची ज्ञानज्योत... प्रज्वलित करून, स्वतः ज्ञानसागराच्या निरांजनातील वात होऊन, रक्ताचा एक एक थेंब आटवून, अखंड तेवत ठेवणारी युग स्त्री म्हणजेच सावित्रीबाई फुले.
नायगाव येथील नेवासे पाटलांच्या घरात जन्मलेली ही ज्योत, अवघ्या नऊ वर्षांची असताना फुलांच्या घरची माळीन झाली.
जगाच्या बाजारात गुलामगिरी, जातीयता, बेगडा धर्मवाद आणि वर्चस्ववाद बोकाळला असताना ज्योतिरावांच्या रूपाने एक सूर्य उदयास आला होता. त्या ज्ञानसूर्याने आपल्या प्रभावी विचारांच्या तेजाने सारा समाज भारून टाकला होता. आपल्या आजूबाजूची जनता शिकली तरच ती सुधारेल, अन्याय अत्याचाराविरुद्ध उभा राहील, हे त्यांनी ओळखले. लोकांना विद्येचे महत्व पटवून देताना ते म्हणतात..
विद्येविना मती गेली.
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेले,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले.....
इतके अनर्थ एका अविद्येने केले....
हेच विचार घेऊन सावित्रीबाई ज्योतिरावांच्या छत्रछायेखाली शिकल्या. शाळा सांभाळता सांभाळता त्या मुख्याध्यापिका झाल्या. 1848 ला शाळेत फक्त सहा मुली होत्या. पुढे हा ज्ञानयज्ञ इतका मोठा झाला की, सावित्रीबाईंनी आपल्या हयातीत 40 शाळांचे जणू ज्ञान विद्यापीठ तयार केले.
सावित्रीबाईंनी आपल्या साडीवर शेणाचे गोळे झेलले म्हणून आजच्या स्त्रीची साडी चकचकीत झाली. सावित्रीबाईंनी कर्मठ लोकांचे दगड डोक्यावर झेलून त्या रक्तबंबाळ झाल्या म्हणून आजची स्त्री कुंकवाचा लाल रंग तोऱ्याने मिरवत आहे.... अशा कितीतरी यातना सावित्रीबाईंनी झालेल्या म्हणून आजची स्त्री सुखाचा व स्वातंत्र्याचा मनमोकळा श्वास घेत आहे. अशा या महान समाज शिक्षिकेस युग स्त्रीस माझा मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment
Thanks lot for your loveable comment plz follow and share